सन 2002 पासून श्रीमदभगवदगीता अभ्यासक असलेल्या समीर गणेशराव दुधगांवकर यांच्या आवडीचे महत्वाचे श्लोक
व्यसनमुक्त योद्धा समीर दुधगांवकर :
आध्यात्मिक
, दूरदर्शी नेतृत्व..!!
परभणी-हिंगोली परिसरातील दुधगांवकर कुटुंबाची आध्यात्मिक परंपरा १८९० पासून पंढरपुरातील आषाढी वारीत माउली पादुका अभिषेक करण्याच्या समारंभाशी बांधली गेली आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून या पवित्र विधीने कुटुंबात सातत्याने भक्तीभाव, आध्यात्मिक जागृती आणि परंपरेचे संस्कार जपले आहेत.
ज्ञानेश्वर माउली हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात आणि भगवान विष्णूचेच आठवे अवतार श्रीकृष्ण यांनी मानवजातीला श्रीमदभगवदगीता प्रदान केली. कदाचित याच आध्यात्मिक वारशाने समीर दुधगांवकर यांच्या मनात गीतेकडे नैसर्गिक ओढ निर्माण केली असावी असे आम्हाला वाटते. त्यांच्या कुटुंबाची आध्यात्मिक यात्रा माउलींपासून त्यांच्या मूळ — भगवान विष्णूपर्यंत — सतत वरच्या दिशेने चालू असल्याचे यातून दिसून येते.
आजच्या काळातील सामाजिक व्याधींवर गीतेचे महत्त्व
श्रीमद-भगवद-गीता केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर आजच्या भ्रष्टाचार, नैतिक अधोगती, स्वार्थी वृत्ती, द्वेष आणि समाजातील वाळवीसारख्या अंतर्गत क्षयावर प्रभावी उपाय आहे.
कर्मयोग, समभाव, त्याग, सात्विक आचरण आणि परमेश्वरात पूर्ण शरणागती यांच्या शिकवणुकीद्वारे व्यक्ती आणि राष्ट्र दोन्ही पातळीवर पुनर्निर्माण सहज शक्य आहे.
खालील भागात विद्वानांच्या विचारांसह समीर यांच्या मते वरील उद्देशासाठी महत्वपूर्ण असलेल्या श्रीमदभगवदगीतेच्या श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे.
पूर्ण गीता पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी लिंक शेवटी उपलब्ध आहे.
श्रीमदभगवदगीता आणि भारतीय संस्कृति याबाबत
काही विद्वानांचे विचार
क्वांटम फिजिक्स जगातील सगळ्यात कठीण विषय मानला जातो.
२. विल्यम जेम्स (अमेरिकन मानसशास्त्र क्षेत्राचे जनक)
“वेदांमधून आपल्याला शस्त्रक्रिया, औषध, संगीत आणि घरबांधणी यांच्या व्यावहारिक कलांचे ज्ञान मिळते, ज्यात यंत्रचालित कला देखील समाविष्ट आहे. ते जीवन, संस्कृती, धर्म, विज्ञान, नैतिकता, कायदा, ब्रह्मांडशास्त्र आणि हवामानशास्त्र या प्रत्येक पैलूंचा विश्वकोश आहेत.”
३. डॉ. आर्नोल्ड टॉयनबी (ब्रिटिश इतिहासकार)
“आता हे स्पष्ट होत चालले आहे की, ज्या अध्यायाची सुरुवात पाश्चिमात्य झाली होती, त्याची समाप्ती भारतीय पद्धतीने झालीच पाहिजे, अन्यथा तो मानवजातीच्या स्व-विनाशात संपेल. इतिहासातील या अत्यंत धोकादायक क्षणी, मानवजातीच्या मुक्तीचा एकमेव मार्ग हा भारतीय मार्गच आहे.”
श्री. समीर दुधगांवकर यांचे आवडते श्लोक….
विश्वरूपदर्शनयोग
अध्याय अकरावा – (परम सत्य, अविनाशी ईश्वराचे)
९ - संजय म्हणाला, हे राजा ! या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले.
(१०&११) अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अदभूत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलोकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरुपाच्या बाबतीत सर्वच अदभूत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होत.
(१२) आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करी शकेल.
(१३) त्या वेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरुपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली, परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली.
(१४) त्यानंतर, भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला.
गीता अध्याय ८, श्लोक ०३ -
श्रीभगवान म्हणाले, "अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात."
अध्याय १३, श्लोक 31 –
ज्या क्षणी व्यक्ती सगळ्या प्रवृत्तींचे (भूतांचे) निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व प्रवृत्तींचा (भूतांचा) विस्तार आहे - असे पाहतो, त्याच क्षणी तो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. ॥ ३१ ॥
अध्याय 3, श्लोक ३१
"परम सत्याचे ज्ञान असणारा माणूस कधी इंद्रिये आणि इंद्रियांना खुश करण्यासाठी आसक्त नसतो. कारण ज्ञानी माणसाला भक्तीभावासहीत केलेल्या कर्मांत आणि फळप्राप्तीसाठी केलेल्या कर्मांमधला फरक व्यवस्थित माहिती असतो."
अध्याय १४, श्लोक २६ आणि २७
आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो, तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून ब्रह्म स्वरूप प्राप्त करण्यास योग्य ठरतो.
॥ २६ ॥
कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी (ईश्वर) आहे.
॥ २७ ॥
श्रीमद-भगवद-गीता अध्याय १८, श्लोक ५० ते ६२:
हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे, त्या नैष्कर्म्यसिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे. ॥ ५० ॥
॥ ५१, ५२, ५३ ॥
- विशुद्ध बुद्धीने युक्त;
- हलके, सात्त्विक आणि नियमीत भोजन घेणारा;
- शब्दादी विषयांचा त्याग करून, एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा;
- सात्त्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रिये यांच्यावर संयम ठेवून, मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा;
- राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा;
- अहंकार, बळ, घमेंड, कामना, क्रोध, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा;
- ममतारहित व शांतियुक्त
असा पुरुष ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो.
॥ ५१, ५२, ५३ ॥
मग तो सच्चिदानंदघन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सम भाव बाळगणारा योगी माझ्या परम-भक्तीला प्राप्त होतो. ॥ ५४ ॥
त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे, अगदी बरोबर तसाच तत्त्वतः जाणतो, तसेच त्या भक्तीने मला तत्त्वतः जाणून त्याचवेळी माझ्यात प्रविष्ट होतो. ॥ ५५ ॥
माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कर्मे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. ॥ ५६ ॥
सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धीरूप योगाचा अवलंब करून मत्परायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो. ॥ ५७ ॥
वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील, तर नष्ट होशील अर्थात परमार्थाला मुकशील. ॥ ५८ ॥
तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही, असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील. ॥ ५९ ॥
हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस, तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. ॥ ६० ॥
हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मांनुसार फिरवीत असतो. ॥ ६१ ॥
हे भारत (अर्जुना), त्या परमेश्वराचाच सर्वभावे शरण घे. त्याच्या कृपेने तुला परम शांती आणि शाश्वत स्थान प्राप्त होईल. ॥ ६२ ॥
अध्याय १८, श्लोक ६१ (श्रीमद्भगवद्गीतेच्या एकुण ७०० श्लोकांपैकी ६८३ वा श्लोक)
"हे अर्जुन ! परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे; जसे काही हे सर्व जीव उर्जेने बनलेल्या यंत्रावर आरुढ असावेत."
(६२) हे भारता ! पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल.
अध्याय २, श्लोक ४६ -
"लहान विहिरीद्वारे होऊ शकणारी सर्व कार्ये मोठ्या जलाशयाकडून सहजपणे होऊ शकतात. तसेच ज्याला परम सत्य (देवाची महती) कळले आहे तो वेदांचा उद्देश देखील पूर्ण करु शकतो."
अध्याय २, श्लोक ४८
"हे अर्जुन ! यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करुन समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते."
अध्याय १८, श्लोक ८
"जो मनुष्य, नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्याने रजोगुणात त्याग केला आहे. असे करणे कधीही त्यागाच्या फलप्राप्तीसाठी योग्य नसते."
अध्याय १८, श्लोक ११
"देहधारी जीवांना सर्व कर्मांचा त्याग करणे खरच अशक्य आहे; परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला खरा त्यागी म्हटले जाते."
अध्याय १८, श्लोक १२
"जो त्यागी नाही त्याला मुत्युनंतर इष्ट, अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकारचे कर्मफल प्राप्त होते. परंतु जे त्यागी आहेत (संन्यासाश्रमात आहेत) त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःखरुपी फळ भोगावे लागत नाही."
श्रीमद-भगवद-गीता अध्याय १७, श्लोक २० ते २५
दान देणे कर्तव्य आहे, या भावनेने जे दान, देश, काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्त्विक म्हटले गेले आहे ॥ २० ॥
परंतु जे दान क्लेशपूर्वक, प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते दान राजस म्हटले आहे ॥ २१ ॥
जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे ॥ २२ ॥
सृष्टीच्या आरंभापासून ॐ तत् सत् या शब्दांना परम सत्य ब्रह्माची अभिव्यक्ती समजली जाते. त्यांपासून ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत ॥ २३ ॥
म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तप रूप क्रियांचा नेहमी ॐ या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो ॥ २४ ॥
तत् या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दान रूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात ॥ २५ ॥
The Absolute Truth is the objective of devotional sacrifice, and it is indicated by the word 'sat'. The performer of such sacrifice is also called 'sat', as are all works of sacrifice, penance and charity which, true to the absolute nature (sat-bhave), are performed to please the Supreme person, O son of Partha.
Anything done as sacrifice, charity or penance without faith in the Supreme, O son of Partha, is impermanent. It is called 'asat' and is useless in this life and the next.
अध्याय चौथा – ज्ञानकर्म संन्यासयोग, श्लोक 13, 14, 15
- भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत आणि तू जाणले पाहिजे की, जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे.
- कोणत्याही कर्माने मी बध्द होत नाही तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुध्दा कर्मफलामुळे बध्द होत नाही.
- प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांची माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुध्दा त्यांच्या पद्चिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे.
अध्याय अठरावा..
(40) या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही, जो या प्रकृतीच्या तीन गुणांपासून मुक्त आहे.
(41) हे परंतप ! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांव्दारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे.
(42) शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता – या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात.
(43) शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युध्दामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात.
(44) कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम वं इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे.
(45) आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. हे कसे शक्य होते याविषयी आता माझ्याकडून ऐक.
(46) सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून, मनुष्य आपल्या स्वकर्माव्दारे सिद्धी प्राप्त करू शकतो.
(47) मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे, परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही.
(48) ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कौंतेया ! मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये.
अध्याय १६, श्लोक २१
"काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये नेणारी तीन व्दारे आहेत. प्रत्येक समंजस मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. (आत्म्याच्या निकृष्टपणात वाढ होते, आत्म्याचा ऱ्हास होतो, अवनती होते)."
अध्याय १६, श्लोक २३
"जो शास्त्रविधींना टाकून देतो आणि आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे वागतो, त्याला प्राविण्य (सिद्धी), सुख, किंवा सर्वोच्च गंतव्यस्थान प्राप्त होत नाही."
अध्याय ३, श्लोक ११ (श्रीमद-भगवद-गीतेच्या एकुण ७०० श्लोकांपैकी १२९वा श्लोक)
"यज्ञाने (त्याग) संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि याप्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने, सर्वत्र समृद्धीचे (सर्वोच्च आशिर्वादाचे) साम्राज्य पसरेल."
अध्याय 3, श्लोक ३७
श्रीभगवान म्हणाले, "हे अर्जुना ! रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेले कामवासना ज्याचे क्रोधात रुपांतर होते, हाच (कामवासना) या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे."
अध्याय 3, श्लोक ३८
ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि अभ्रक गर्भाने वेष्टिला जातो त्याचप्रमाणे जीव, या शत्रुद्वारे (कामवासना) आच्छादिला जातो.
अध्याय ६, श्लोक ४०
श्रीभगवान म्हणाले, " हे पार्था! शुभकार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही आणि हे मित्रा; जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींकडून कधीही पराभूत होत नाही."
अध्याय १८, श्लोक ६६
"सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू दुःखी होऊ नकोस."
अध्याय ३, श्लोक ११ (श्रीमद-भगवद-गीतेच्या एकुण ७०० श्लोकांपैकी १२९वा श्लोक)
'भक्तांना हे परम रहस्य जो मनुष्य सांगेल त्याला निश्चितपणे शुध्द भक्तीभाव प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे (परमेश्वराकडे) परत येईल यात मुळीच संशय नाही. त्याच्यापेक्षा (असे करणाऱ्यापेक्षा) मला (परमेश्वरासाठी) अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नसेल, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कधी कोणी होणारही नाही."
अध्याय २, श्लोक ६६
"जो भगवंताशी जुडलेला नाही त्याच्याकडे बुद्धी नसते किंवा भगवंताविषयी भावना पण नसतात; ज्या गोष्टींशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही आणि शांतीवाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल?"
अध्याय ६, श्लोक १७
"यथायोग्य आहार-विहार, कर्तव्य बजावतांना यथायोग्य कर्म करणे तसेच नियमन केलेला स्वप्नाळूपणा व समभाव जपुन जागृत राहणे - सगळी दुःखे कमी करते."
अध्याय २, श्लोक 33 / ३४
"परंतु तु जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य निभावले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये दुर्लक्ष केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि यामुळे योध्दा म्हणुन तु तुझी कीर्ती गमावशील.
लोक नेहमी तुझ्याबद्दल बदनामीकारक गोष्टी (एक भित्रा आणि पळपुटा व्यक्ती) बोलतील. सन्माननीय व्यक्तीसाठी बदनामी ही मरणापेक्षाही वाईट असते."
अध्याय १२, श्लोक ०२ ते ०४
(श्रीमदभगवतगीतेच्या एकुण ७०० श्लोकांपैकी ४७१वा, ४७२वा आणि ४७३वा श्लोक)
श्री भगवान म्हणाले, "जे लोक त्यांचे मन माझ्यावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये मग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत.
परंतु जे लोक सर्व इद्र्यिाचे संयमन करुन आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त; जे इद्रिंयांच्या जाणिवेच्या पलीकडे असलेले, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परमसत्याच्या (Absolute Truth) निर्विकार रुपाची पूर्ण उपासना करतात, सर्वांच्या हितासाठी जे काम करण्यात गुंग राहतात, ते शेवटी माझी प्राप्ती करतात."
अध्याय १३, श्लोक ८ ते १२
- विनम्रता, आडंबरापासून मुक्ती, अहिंसा, क्षमा,
- (सरलता) सादगी, आचार्यांची (गुरूंची) सेवा,
- मन आणि शरीराची शुद्धता, दृढता आणि आत्मसंयम, इंद्रियांसंबंधित (त्यांच्या विषयांप्रती उदासीनता) विरक्ती, अहंकाररहित असणे,
- जन्म, रोग, वृद्धापकाळ आणि मृत्यू यांच्या दोषांवर ध्यान देणे, अनासक्ती, स्त्री-पुरुष, मुले आणि घर-संपत्ती इत्यादी प्रती ममतारहित असणे,
- जीवनातील वांछित आणि अवांछित घटनांप्रती समभाव,
- माझ्याप्रती अनन्य आणि अविरत भक्ती, एकांत स्थळांवर राहण्याची इच्छा,
- लौकिक जनांप्रती विमुखता, आध्यात्मिक ज्ञानात स्थिरता आणि परम सत्याचा शोध
— या सर्व गोष्टींना मी ज्ञान घोषित करतो आणि ज्या गोष्टी याच्या विरुद्ध आहेत, त्यांना मी अज्ञान म्हणतो.
श्रीमदभगवतगीता अध्याय ३, श्लोक २८:
हे महाबाहो अर्जुन..! तत्त्वज्ञानी व्यक्ती (ज्याला परम सत्याची जाण आहे असा व्यक्ती) आत्म्याला गुण आणि कर्म यांपासून भिन्न स्वरूपात ओळखतात. ते समजतात की 'इंद्रिय, मन इत्यादींच्या रूपात केवळ गुणच इंद्रियविषयांमध्ये (गुणांमध्ये) संचलित होतात. म्हणून ते त्यात फसत नाहीत.
अध्याय १६, श्लोक १-३
श्रीभगवान म्हणाले, "निर्भयपणा, आध्यात्मिक ज्ञानाने स्वशुद्धी, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, स्वअध्ययन, कठोर शिस्तबद्धता (तपस्या), साधेपणा, अहिंसा, खरेपणा, क्रोधापासून मुक्तता, त्याग, शांतपणा, चुका शोधण्याचा तिटकारा, जीव असणाऱ्या सगळ्यांसाठी दया, लोभ नसणे, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, धैर्य, स्वच्छता आणि व्देष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती
हे सर्व दैवी गुण, हे भरता, दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात!"
अध्याय १६, श्लोक ४
"हे पार्था; दंभपणा, उर्मटपणा, अभिमान, राग, निष्ठुरपणा आणि अज्ञान -हे असुरी (राक्षसी) प्रकृतीच्या लोकांचे गुण आहेत."
अध्याय १६, श्लोक १३-१५
"असुरी मनुष्य विचार करतो की, 'आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या इच्छेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके आता माझे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रु आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रुही मारले जातील. मी सगळ्यांचा मालक आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. मी हुशार आहे आणि मला सगळे कळते. माझ्यासारखा कोणीच नाहीये. मी यज्ञ करेन, मी थोडे दान देईन आणि याप्रमाणे मी आनंद मनवेल. अशा प्रकारे ही लोकं अज्ञानाने मोहित झालेले असतात."
१८, श्लोक ६
(श्रीमदभगवतगीतेच्या एकुण ७०० श्लोकांपैकी ६२८वा श्लोक) "ही सर्व कर्मे (यज्ञ, दान, तप) कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ! ही कर्मे कर्तव्यबुद्धीने केली पाहिजेत, हे माझे सर्वोच्च आणि अंतिम मत आहे."
अध्याय १६, श्लोक ८-९
"ते (असुरी लोकं) म्हणतात की, हे जग अवास्तव आहे व जग निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही.
त्यांचे म्हणणे आहे की, केवळ वासनेच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि वासनांशिवाय अन्य कोणतेही कारण जग बनण्याच्या मागे नाही.
अशा निष्कर्षावर विसंबून राहून, आसूरी लोक, जे स्वतःमध्येच हरवून गेलेले असतात, ज्यांच्यात अल्पबूद्धी असते, असे असुरी लोक जगाचा विनाश करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अहितकारी व उग्र कर्मांमध्ये व्यस्त असतात."
अध्याय १४, श्लोक २२-२५
श्रीभगवान म्हणाले, "हे पांडुपुत्र !
- जो प्रचीती, आसक्ती आणि मोहमाया यांची उपस्थिती नाहीशी झाली तरी त्यांची आकांक्षा करीत नाही;
- जो त्रिगुणांच्या (सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण) प्रभावामध्येही अविचलीत आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रीय आहेत हे जाणून स्थितप्रज्ञ आणि दिव्य राहतो;
- जो आत्मस्थित आहे आणि सुख-दुःखाला सारखेच मानतो;
- जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो;
- जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो;
- जो सातत्यपूर्ण असतो आणि स्तुती व निंदा मान व अपमान याकडे समभावाने पाहतो;
- जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो
- आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे
त्या मनुष्याला 'गुणातीत' म्हटले जाते."
अध्याय १७, श्लोक ५-६
"जे लोक शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, तेही दंभ आणि अहंकारयुक्त भावनेमुळे, जे कामभावनेने आणि क्रोधभावनेने झपाटलेले असतात,
जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्त्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात, त्यांना असूरी (राक्षसी) समजावे."
अध्याय १७, श्लोक ९
"रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, तिखट, झणझणीत, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार त्रास, दुःख आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो."
अध्याय ३, श्लोक २९
"प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त राहतात. ज्ञानी व्यक्तिने चांगल्या रीती न जाणनाऱ्या अश्या मुर्ख अज्ञानी लोकांना अस्थिर करु नये."
अध्याय १८, श्लोक २८
"जो कर्ता
- नेहमी शास्त्राविरुध्द कर्म करण्यात गुंतलेला असतो,
- हट्टी (जो फक्त स्वतःच्या स्वभावाप्रमाणे कार्य करतो),
- जो दुष्टपणा करतो,
- फसवणूक करणारा,
- दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो
- व जो सदैव आळशी, खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो;
त्याला तमोगुणी कार्यकर्ता म्हटले जाते."
अध्याय १४, श्लोक ९
"हे भरता ! सत्वगुण हा मनुष्याला सुखासोबत बांधतो, रजोगुण हा सकाम कर्माशी बांधतो अणि तमोगुण हा वेडेपणाशी बांधतो."
(तमोगुणाला इंग्लिश शब्द Ignorance वापरण्यात आलेला आहे, ज्या शब्दाचा अर्थ आहे की अज्ञान-इथे Covering one's knowledge म्हटले आहे म्हणजे व्यक्तीचे ज्ञान आवृत करणारी मनःस्थिती)
अध्याय १८, श्लोक ३७
"जे सुरवातीला विषासारखे वाटते, पण शेवटी अमृतात परावर्तित होते, त्याला सात्विक सुख असे म्हणतात. आत्मज्ञानात वसलेल्या शुद्ध बुद्धीने हे सात्विक सुख निर्माण होते."
अध्याय १७, श्लोक १४ (श्रीमदभगवतगीतेच्या एकुण ७०० श्लोकांपैकी ६०८वा श्लोक)
"भगवंत, ब्रह्म, अध्यात्मिक गुरु व प्रज्ञावंत व्यक्तींची पूजा करणे आणि पावित्र्य, सरलपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा (हे जोपासणे) यांना शारीरिक तप म्हटले जाते."
अध्याय १७, श्लोक १५
"सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना क्लेश दायक शब्द न बोलणे आणि नियमितपणे स्वतः अभ्यास करुन सुचणारे शब्द बोलणे - अशा वागण्याला वाचिक तप असे म्हणतात."
(तपश्चर्या करणाऱ्याला आशिर्वाद मिळेल असे भगवंत शिकवितात. स्वतः अभ्यास असल्याशिवाय बोलु नये, असे वागल्यास वाचिक तपश्चर्या होईल, आशिर्वाद मिळतील!)
अध्याय ३, श्लोक २४-२५
"मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन.
अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, विद्वान मनुष्याने, जगाच्या भल्यासाठीच्या वेगवेगळ्या कर्मात गुंतून रहावे."
अध्याय ३, श्लोक २६
नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करु नये. याउलट भक्तिभावाने कर्म करुन त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे.
पूर्ण गीता पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करावे.